

जळगाव : "जागतिक केळी उत्पादनाच्या सुमारे 30 टक्के केळी भारतात उत्पादित होते, मात्र आपल्या देशात त्याचे सेवन अपेक्षित प्रमाणात होत नाही. केळी हे अत्यंत पौष्टिक असून, दैनंदिन आहारात त्याचा समावेश आरोग्यासाठी उपयुक्त आहे. दररोज 'दोन केळी खा आणि निरोगी रहा' हा मंत्र अंगीकारण्याची गरज आहे," असे प्रतिपादन डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
जागतिक केळी दिनानिमित्त रावेरमध्ये उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जैन फार्मफ्रेश फूड्स लि. आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.16) रोजी रावेरमध्ये जागतिक केळी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रावेर पिपल्स बँकेजवळ झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत केळीचे खोड आणि केळी घडाचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. के. बी. पाटील यांच्यासह जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, माजी आमदार अरुण पाटील, केळी महासंघाचे भागवत पाटील, डॉ. संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर केळी आणि केळीच्या ज्यूसचे वाटप करण्यात आले. तसेच, खास सजावटीने तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सेल्फीचा आनंद लूटला.
भारताचा केळी उत्पादनात पहिला क्रमांक असून केळीचे मात्र सेवन कमी असल्याचे समोर आले आहे. डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वाधिक केळी उत्पादक देश असला तरी केळीचे प्रतिव्यक्ती वार्षिक सेवन केवळ 13 किलो आहे. याच्या तुलनेत टांझानिया, युगांडा सारख्या देशांमध्ये हे प्रमाण 400 किलोपर्यंत आहे. युरोपमध्ये 29 किलो, अमेरिका 23 किलो तर जपानमध्ये 16 किलो इतके केळीचे वार्षिक सेवन होते.
केळीत कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी-6 यांसारखी पोषणमूल्ये मुबलक प्रमाणात आहेत. दररोज एक केळी खाल्यास शरीरातील बी-6 व्हिटॅमिनची गरज पूर्ण होते. तसेच केळ्यापासून बनणारे मिल्कशेक्सही शरीरासाठी लाभदायक आहेत.
पाटील म्हणाले की, जैन इरिगेशन गेल्या चार दशकांपासून ठिबक सिंचन, फर्टिगेशन, पॅकेजिंग तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतीद्वारे केळी शेतीत क्रांती घडवत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. उपक्रम यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहुल भारंबे, मोहन चौधरी, चेतन गुळवे, तुषार पाटील, शुभम पाटील, भास्कर काळे, सागर मोरे, यतिश चौधरी, तुषार हरिमकर आदींसह जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूड्सच्या सहकाऱ्यांचे योगदान लाभले.
फक्त लागवड वाढवण्याऐवजी निर्यातक्षम गुणवत्तेवर भर देण्याची गरज आहे.
अरुण पाटील, माजी आमदार