

जळगाव : भुसावळ शहर, जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून, अ-श्रेणी नगरपालिका असतानाही येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहराला नऊ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे, तर पाणी समस्या भेडसावत असतांनाच कधीकधी हा कालावधी 11 ते 12 दिवसांपर्यंत वाढतो आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, शहराला लागूनच तापी आणि पूर्णा या नद्या वाहत असून, हतनूर धरण देखील याच भागात आहे, तरीही पाण्याचा गंभीर प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
भुसावळ हे रेल्वे जंक्शन असून, येथे ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र आणि वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी यांसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक संस्था या ठिकाणी आहेत. या महत्त्वाच्या शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतेच बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील रायझिंग पाईपलाईनला लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठा विलंबित झाला होता. परिणामी शहरवासियांना तब्बल 11-12 दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
भुसावळ नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश राजवटीपासून झाली असून, ही जिल्ह्यातील एकमेव अ-श्रेणी नगरपालिका आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 1958 मध्ये उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहे. सध्या 22 एमएलडी क्षमतेचे दोन प्लांट कार्यरत असून, त्यामध्ये 10 एमएलडी आणि 12 एमएलडी क्षमतेचे युनिट आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हे अपुरे असून, शहराला 35 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प आवश्यक आहे.
सध्या कार्यरत जलशुद्धीकरण केंद्र अतिशय जुने असल्याने नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे कठीण जात आहे. मात्र, अमृत-1 आणि अमृत-2 योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा शक्य होईल. यासाठी काही कालावधी लागणार आहे.
दीपक चौधरी , भुसावळ नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता
2017 मध्ये भुसावळ शहराचा समावेश अमृत योजनेत करण्यात आला होता. मात्र, पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाइन टाकण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली. सध्या अमृत-2 योजना सुरू असून, जॅकवेलचे कामही सुरू झाले आहे. या योजनेद्वारे 45 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे.