

जळगाव : हिंदू समाजासमोर उभ्या राहणाऱ्या आगामी आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय समितीची दोन दिवसीय बैठक जळगावात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला देशभरातून विश्व हिंदू परिषदेचे ४६ प्रांतांचे मंत्री, विविध पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते अशा सुमारे ४०० जणांचा सहभाग आहे. बैठकीचा प्रारंभ गुरुवार (दि. १७ जुलै) झाला.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री बजरंगलाल बांगडा, प्रचार समितीचे विजय तिवारी आणि भैयालाल उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषद कोणताही राजकीय पक्ष नाही. आम्ही फक्त हिंदू हितासाठी काम करतो. हिंदूंचे हित जपणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाजूने आम्ही उभे राहतो, असं बांगडा यांनी यावेळी सांगितले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर हिंदू मंदिरांवर राज्य व केंद्र शासनाचे नियंत्रण राहिले आहे. “हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन पूर्णतः हिंदू समाजाकडे असावे आणि मंदिरातून येणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग फक्त हिंदू समाजाच्या कल्याणासाठी केला जावा,” अशी मागणी त्यांनी केली. ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करून मंदिरांचे शासन नियंत्रणातून मुक्त होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदू समाजाच्या हितासाठी शासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी परिषदेतून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. आवश्यक असल्यास निवेदन, जनजागृती आणि आंदोलनही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
समाजातील अस्मिता जपण्यासाठी आणि अवैध धर्मांतर थांबवण्यासाठी बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीद्वारे देशभरात अभियान राबवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेषतः युवकांना नशेच्या विळख्यात ओढण्याचा प्रयत्न चिंताजनक असून याविरोधात “राष्ट्रवादी नशामुक्ती अभियान” राबवले जात आहे. शाळा, महाविद्यालये व समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
ही दोन दिवसीय बैठक हिंदू समाजासाठी महत्त्वाच्या निर्णयांना दिशा देणारी ठरणार आहे, असा विश्वासही परिषदेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे.