

जळगाव : तीव्र उकाडा जाणवणाऱ्या तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदाचा 'मे' महिना मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसाठी काळजीचा ठरला आहे. मे महिन्यात तब्बल सात दिवस अवकाळी पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस थांबत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
16 आणि 18 मे रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे तीन तालुक्यांतील 14 गावांतील 199 शेतकऱ्यांचे 145.9 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात केळी बागांचे सर्वाधिक नुकसान झाले असून 125.59 हेक्टर क्षेत्रातील केळी नष्ट झाली आहेत. त्याचबरोबर मका – 9 हेक्टर, ज्वारी – 0.80 हेक्टर, कांदा – 1.20 हेक्टर, आणि फळपिके – 8.50 हेक्टर या पिकांचेही नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मे महिन्यातील 5, 6, 7, 11, 12, 16 व 18 या तारखांना पावसाची नोंद झाली असून, या सात दिवसांत 723 गावांतील तब्बल 16,747 शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण 10,412.53 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मुग – 28.30, तिळ – 4, मका – 1013.53, ज्वारी – 249.55, बाजरी – 534, भाजीपाला – 196.20, कांदा – 428.16, केळी – 6690.95, फळपिके – 1006.80 हेक्टर क्षेत्रांचा समावेश आहे.
सध्या खरीप पेरणीपूर्वीच्या तयारीच्या काळात शेतकरी शेतातील ओलावा सुकण्याची वाट पाहत आहेत. मात्र सततच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून नुकसान भरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी केली जात आहे.