

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये “धरती आबा जनभागीदारी अभियान” देशभरात मिशन मोडमध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना १५ जून ते ३० जून या कालावधीत राष्ट्रीय पातळीवर चालवली जात असून, अनुसूचित जातीच्या नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्यात जनजागृती घडवून आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून शनिवार (दि.21) रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते या अभियानाच्या जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, दोन्ही मंत्र्यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
देशभरातील अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये लाभ संतृप्ती शिबिरे सातत्याने राबविली जात असून, मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या समस्या आणि अर्जांसह या अभियानात सहभागी होत आहेत. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि सरकारी योजनांशी त्यांना जोडण्याचे हे सशक्त माध्यम ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही मोहीम आदिवासी गौरव वर्षाचा एक महत्त्वाचा भाग असून, क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ही विशेष संकल्पना सुरू केली आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, तसेच इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.