

जळगाव : आखाजी या पारंपरिक सणानिमित्त खानदेशातील घराघरात पुरणपोळी आणि आंब्याचा रस यांचा बेत असतो. सणाच्या या खास पार्श्वभूमीवर, बुधवार (दि.30) आजरोजी सरकारी सुट्टी जाहीर नसतानाही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टीसदृश वातावरण पाहायला मिळाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासूनच जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित होते आणि शासनाच्या 'शंभर दिवस कार्यक्रम' अंतर्गत विविध कामकाजांची पाहणी करत होते. सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या टेबलवर नियमित कामकाज करताना दिसले. शिपाई वर्गही आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होता.
मात्र विशेष बाब म्हणजे, सकाळपासून दुपारपर्यंत कोणताही नागरिक तक्रार, निवेदन किंवा अन्य कामासाठी कार्यालयात येताना दिसला नाही. आंदोलन, मोर्चा किंवा निवेदन देण्यासाठीही कोणी आले नव्हते. कार्यालय परिसरातील चारचाकी वाहनांची पार्किंगसुद्धा ओसाड होती.
अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात व्यस्त असले तरी नागरिकांच्या अनुपस्थितीमुळे 'अघोषित सुट्टी'सारखे वातावरण जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले.