

जळगाव: बेंगळुरू येथील दोन व्यक्ती मुक्ताईनगर तालुक्यातील धुपेश्वर या धार्मिक ठिकाणी दर्शनासाठी आले. गावात आल्यानंतर त्यांना अज्ञात महिलेने चांगल्या ठिकाणी नेण्याचे आश्वासन देत गावात नेले. मात्र महिलेच्या सांगण्यावरून गावात गेल्यानंतर दहा जणांच्या टोळीने दोघांवर हल्ला करून त्यांच्याकडील सुमारे आठ लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एस. सी. अभिषेक (वय 28) व त्याचा सहकारी हे दोघे धुपेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर अजिंठाच्या दिशेने जात असताना मधापुरी गावाजवळील नदीपुलाजवळ त्यांना एका महिलेने रिसॉर्टसाठी चांगली जागा असल्याचे सांगून गावात नेले. मात्र गाडीतून उतरताच अज्ञात टोळीने या दोघांना एका घरात नेले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांकडे असणारी 2 लाख रुपये रोख, 75 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, दिड लाख रुपयांचे ब्रेसलेट, वीस हजार रुपयांचा मोबाईल, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे चार लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. अशाप्रकारे एकूण आठ लाख पन्नास हजार रुपयांची लूट महिलेसह टोळीने केली.
याशिवाय, टोळीने दोघांना जबर मारहाणही केली. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील पुढील तपास करत आहेत.