

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या बसथांब्यावर ट्रक चालकाने अतीक्रमण केले असून साईड रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी ॲपे रिक्षा रिक्षा व खाजगी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे तर एसटीला रस्त्यावरच प्रवाशांना उतरावे लागत आहे. त्याचबरोबर वाहतूककोंडी होऊ नये याचीही काळजी बस चालकाला घ्यावी लागत आहे.
जळगाव शहरातील सर्वात रहदारीच्या दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा चौक असलेला अजिंठा चौफुली या भागात मोठ्या प्रमाणात रात्र व दिवस वाहतूक सुरू असते. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झालेले आहे. त्यामुळे बसला येण्या जाण्यासाठी व प्रवाशांना उभे राहण्यासाठी बसथांबा बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रवाशांकरीता शेड ही टाकण्यात आलेले आहेत.
मात्र, या बसस्थानकाचा उपयोग खाजगी ट्रकचालक घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये बसतांना आणि उतरतांना अडचणी निर्माण होऊन प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवासी सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून प्रवास करतात. मात्र त्यांना अजिंठा चौफुली या ठिकाणी रस्त्यावरच धोक्याच्या परिस्थितीत उतरावे लागते किंवा चढावे लागत आहे.
अजिंठा चौफुली ही शहराच्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची चौफुली आहे. या चौफुलीवरून भुसावळ, एमआयडीसी, औरंगाबादकडे शहरात व शहराच्या बाहेरून चोपडा व धुळ्याकडे जाणारे रस्ते असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वाहतूक असते. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईट रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहनांना किंवा बसेसला सोडून दयावे लागत आहे. या चौफुलीकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी थेट रस्त्यापर्यंत अतिक्रमण आणि दुकानाचे बोर्ड लावले आहेत. वाहतुकीची जबाबदारी असलेल्या वाहतूक शाखा या ठिकाणी कारवाई करीत असूनही बेशिस्तपणाने वाहने लावतांना दिसून येत आहेत.
अजिंठा चौफुलीवर बेशिस्त वाहनांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल व त्यांना योग्य ती समजली देण्यात येईल जर पुन्हा त्यांनी अशी वाहने बेशिस्त प्रमाणे लावली. त्यांच्यावर किंवा त्यांच्या वाहनावर मोठे दंड करण्यात येईल. परंतु रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण हे महानगरपालिकेचा विषय आहे त्यांनी त्यावर कारवाई करावी.
राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, जळगाव.