

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत पितांबर सोनवणे यांची बदली नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतरच या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. यापूर्वी देखील त्यांची बदली करण्यात आली होती, परंतु काही दिवसांनी मंत्रालयातून आदेश आणून ती रद्द करण्यात आली. आता दुसऱ्यांदा ही बदली स्थगित करण्यात आली आहे.
जळगाव येथे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी, प्रशांत सोनवणे यांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले होते. परंतु प्रशासनिक कारणास्तव 15 एप्रिल 2025 पर्यंत त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. हा निर्णय अवर सचिव दत्तात्रय वसंतराव खारके यांच्या आदेशाने घेण्यात आला आहे.
प्रशांत सोनवणे यांच्या बदलीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एका महिन्यात बदली करण्याचा निर्णय घेतला जातो आणि तो महिना संपण्याआधीच त्याला स्थगिती दिली जाते. त्यामुळे ही बदली का करण्यात आली, ती स्थगित का करण्यात आली आणि यामागील नेमके कारण काय, याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. अधिवेशन काळात बदलीचे आदेश निघाले होते, मात्र अधिवेशन संपताच त्याला स्थगिती का देण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंताची बदली केल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक का केली नाही, हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, यामागील सत्य काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.