

जळगाव : मोबाईलवर रील बनवण्याच्या नादामध्ये दोन शाळकरी मित्रांचा जीव गेला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ रविवारी (दि.26) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस येत असताना जीवघेण्या पद्धतीने व्हिडिओ शूट करत असताना रेल्वेची जोरदार धडक बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रविवार (दि.26) रोजी सुट्टीचा दिवस असल्याने हे दोघे मित्र रेल्वे ट्रॅकवर रील बनवण्यासाठी गेले. सोशल मीडियावर लक्ष वेधून घेईल असा व्हिडिओ तयार करण्यासाठी ते धावत्या रेल्वेजवळ उभे राहिले. त्याचवेळी धरणगावहून जळगावकडे येणारी अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस वेगाने आली आणि दोघांना चिरडून निघून गेली. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात येत आहे.
अपघातात मृत झालेले दोघेही 18 वर्षीय तरुण पाळधी येथील रहिवासी आहेत. प्रशांत पवन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे अशी मयत तरुणांची आहेत. दोघेही महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेटजवळील परिसर) येथील वास्तव्यास होते. मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावामुळे त्यांचा परिसरात चांगला परिचय असल्याने दुर्देवी, अकस्मात मृत्यूने गावात शोककळेचे वातावरण पसरले आहे.
सावध व्हा; धोकादायक स्टंट्स नको
प्रसिद्धीच्या हव्यासात आणि सोशल मीडियावरील स्पर्धेमध्ये अनेक तरुण जीव धोक्यात घालत आहेत. धोकादायक स्टंट्स करताना होणारे अपघात ही चिंताजनक बाब आहे. पाळधी येथील ही घटना पालक आणि समाजाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तरुणांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन आवश्यक असल्याची बाब वारंवार अधोरेखीत होत आहे.