

जळगाव : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी आपल्या तीक्ष्ण चालींनी रंगत वाढवली. अकरा वर्षांखालील गटातील स्पर्धेत महाराष्ट्राचे चारही खेळाडू पहिल्या दोन पटांवर निर्णायक स्थितीत पोहोचले आहेत.
तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचे उद्घाटन प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. कल्याणी नागूलकर यांनी केले. त्यांनी बुद्धिबळाबरोबरच शारीरिक आरोग्याचे महत्त्व सांगत खेळाडूंना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्राचे उद्घाटन डॉ. इंद्राणी मिश्रा यांनी करून खेळभावना, बौद्धिक कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा सल्ला दिला. या वेळी मुख्य पंच देवाशीस बरूआ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.
मुलांच्या गटातील लढती
तिसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या अद्विक अग्रवाल आणि अविरत चौहान यांनी अनुक्रमे प्रल्हाद मुला आणि सौम्य दीपनाथ यांचा पराभव केला. राजस्थानच्या विभोरने पश्चिम बंगालच्या ओशिक मंडळला बरोबरीत रोखले, तर उत्तर प्रदेशच्या प्रयाणने हरियाणाच्या कॅन्डीडेट मास्टर व्योम मल्होत्राला बरोबरीत रोखत आश्चर्याचा धक्का दिला.
चौथ्या फेरीनंतर २३ खेळाडू ३ गुणांसह आघाडीवर होते. अद्विकने निर्वाण शाहवर विजय मिळवत अग्रस्थान राखले, तर अविरत चौहानने कविश लिमयेचा पराभव केला. दिल्लीच्या कॅन्डीडेट मास्टर आरीत शाहने उत्तर प्रदेशच्या प्रत्युशचा सहज पराभव केला. पाचव्या पटावर वेंकट कार्तिकने पश्चिम बंगालच्या अनुभवी सब्रातो मानीचा पराभव केला. पाचव्या फेरीआधी १० खेळाडू ४ गुणांसह, तर १५ खेळाडू ३.५ गुणांसह अजिंक्यपदाच्या शर्यतीत होते.
मुलींच्या गटातील सामने
मुलींच्या गटात अग्रमानांकित दिवि बिजेश (केरळ) हिने तमिळनाडूच्या श्रीनिकाचा पराभव केला. तमिळनाडूची पूजाश्री, त्रिपुराची आराध्या दास, महाराष्ट्राची क्रिशा जैन, तेलंगणाची संहिता, कर्नाटकची नक्षत्रा, पश्चिम बंगालची आदित्री बैस्य यांनीही पहिल्या सात पटांवर विजय मिळवला.
चौथ्या फेरीनंतर केरळची दिवि बिजेश, तमिळनाडूची पूजाश्री, त्रिपुराची आराध्या दास, तेलंगणाच्या श्रीनिका व संहिता पुनगवनम या ४ गुणांसह आघाडीवर होत्या. तर पंजाबची राध्या मल्होत्रा, कर्नाटकची नक्षत्रा, दिल्लीची वंशिका, हरियाणाची काशिका गोयल, झारखंडची दिशिता डे, केरळची जानकी आणि राजस्थानची आराध्या उपाध्याय या ३.५ गुणांसह पुढे आहेत.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
भारतासह संयुक्त अरब अमिरात, अबुधाबी, जर्मनी, मलेशिया येथील भारतीय वंशाचे १४ खेळाडूंसह देशातील विविध राज्यांतील ५३८ खेळाडू या निसर्गरम्य वातावरणातील स्पर्धेत सहभागी झाले आहेत. खेळाडू व पालकांकडून जैन इरिगेशनच्या या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक होत आहे.