

सावदा (जळगाव) : येथील रत्ना दत्तात्रय कासार या महिलेकडील सोन्याची पोत चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्ना कासार या यशवंत मनमोहन पाटील यांच्या घरासमोरून पायी जात होत्या. त्यावेळी लाल काळ्या रंगाच्या बुलेटवर दोन इसम आले आणि त्यांनी रत्ना कासार यांच्या गळ्यातील अंदाजे 22 ते 23 ग्रॅम वजनाची, किंमत सुमारे एक लाख बत्तीस हजार रुपयांची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. घटनेनंतर कासार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सावदा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.
भरदिवसा चोरीमुळे नागरिकांमध्ये भीती
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून जामनेर आणि मुक्ताईनगर या दोन्ही तालुक्यांत अवघ्या 24 तासांत दोन घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मिळून साधारण 1 लाख 34 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे जामनेरमधील ही घटना दिवसा घडल्याने परिसरातील लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
पुरुषोत्तम नगरमध्ये राहणारे अनिल आनंदा सोनार हे रविवार (दि.7) रोजी सकाळी घराला कुलूप लावून कामावर गेले. मात्र दुपारी घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. कपाटातून सोन्याचे चैन, अंगठी आणि कानातील दागिने असे मिळून २२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षा आले. अंदाजे किंमत सुमारे ६९ हजार रुपये चोरीला गेले असून अनिल सोनार यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे पुढील तपास करत आहेत.
अंतुर्लीतील शिक्षक कॉलनीत चाेरीची दुसरी घटना घडली आहे. येथे राहणारे विशाल रमेश तायडे हे कामानिमित्त वरणगाव येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून 5 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 3 ग्रॅम वजनाचे धम्मचक्र पेंडल चोरून नेले. चोरीची एकूण किंमत सुमारे 65 हजार रुपये असून तायडे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी कुलूप तोडून चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.