

जळगाव : "राजकीय पक्ष म्हटल्यावर ताकाला जाऊन भांड लपवण्यात काही अर्थ नाही. पक्षांची खरी तपासणी ही निवडणुकांच्या निकालांवरूनच ठरते," असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
जळगाव दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना देसाई यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना सांगितले की, "ही जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. समविचारांनी एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या हितासाठी ती स्वागतार्ह बाब ठरेल."
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. "गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष सज्ज झाला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, शिवसेना शिंदे गटात अनेक दिग्गज पदाधिकारी गेल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई म्हणाले की, "खासदार, आमदार, काही नेते गेले असले तरी शिवसैनिकांचा बाळासाहेबांवरील विश्वास अढळ आहे. पक्षासाठी खऱ्या अर्थाने कार्य करणारे तळागाळातील शिवसैनिकच समर्थ आहेत."
राज-उद्धव एकत्र येण्याबाबत बोलताना ते म्हणाले, "राज ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि उद्धव ठाकरे यांनीही सहकार्याची तयारी दर्शवली आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे – मुंबईचे महत्त्व कमी करणे, महत्वाचे उद्योग गुजरातमध्ये नेणे या सारख्या घडामोडी राज्याच्या हिताला मारक आहेत." "महाराष्ट्र नेहमीच परिवर्तन घडवतो. राज्याच्या हिताचा विचार करणारे एकत्र आले पाहिजे. कुठल्या शक्ती राज्याच्या विरोधात आहेत, हे ओळखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सर्व प्रयत्न वाया जातील." असेही त्यांनी नमूद केले.