

जळगाव : 'अर्हम विज्जा'चे प्रणेते श्री प्रविणऋषीजी महाराज व मधुरगायक श्री तीर्थेश ऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त गणपतीनगर स्थित स्वाध्याय भवन येथे मंगल प्रवेश झाला. दोन्ही संतांच्या स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जैन हिल्स येथून श्री प्रवीणऋषीजी म. सा. व श्री. तीर्थेश ऋषीजी म. सा. यांनी पायी विहारास सुरवात केली. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अध्यक्ष अशोक जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, संघहितैषी प्रदीप रायसोनी, मंत्री अनिल कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२५चे अध्यक्ष राजकुमार सेठिया, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, दादावाडी विश्वस्त प्रदीप मुथा, जयमल संघाचे स्वरूप लुंकड, पारस राका, साधूमार्गी संघाचे मोतीलाल मुणोत, विनोद मल्हारा, रत्नसंघाचे सुनील बाफना आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
प्रवीणऋषीजी म.सा. म्हणाले, जळगाव धर्मनगरी म्हणून प्रसिद्ध असल्याची प्रचिती आज आली. धर्माप्रती असलेली दृढ आस्था, उत्साह पाहून आनंद झाला असून, आमचे याठिकाणी येणे सार्थकी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. भवरलाल अॅड. कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे नवकारशीची व्यवस्था करण्यात आली होती.