

जळगाव : शहरा लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीला सर्व सुख सुविधा असताना अग्निशामक दलासाठी मात्र नगरपालिकेच्या अग्निशामक दलावर अवलंबून राहावे लागत आहे. स्वतंत्र यंत्रणेसाठी प्रशासनाने प्रस्ताव दिलेला असतानाही फक्त कर लागू नये यासाठी उद्योजकांकडून त्याला नकारघंटा मिळत आहे. कंपनीत आग लागल्यानंतर नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनपाकडे त्या प्रमाणात अग्निशामक दलाची सुविधा आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयडीसी मध्ये आग लागल्यानंतर सर्व काही महानगरपालिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे अग्निशामक दलाची स्वतंत्र यंत्रणा असावी यासाठी गेल्या पाच महिन्यापासून प्रस्ताव विभागाकडे धुळखात पडून आहे.
जळगाव एमआयडीसी हा परिसर जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसीचा परिसर आहे. यामध्ये लघु उद्योगापासून मोठे उद्योगापर्यंत सर्व उद्योग आहेत. यामध्ये सर्वाधिक चटई उद्योग, औषधी केमिकल वस्त्रोद्योग, पाईप उद्योग यासारखे अनेक उद्योग या ठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणात मजुर हे या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये हजर होत असतात.
शहराच्या लगत पासून तर खेडेगावांच्या शिवारापर्यंत एमआयडीसीचा परिसर पसरलेला आहे. व तो दिवसेंदिवस वाढतही आहे असे असताना एमआयडीसीला मात्र अग्निशामक दलासाठी महानगरपालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. जेव्हा की, औद्योगिक कर हा सर्व एमआयडीसी वसूल करीत असताना महानगरपालिका त्यांना अग्निशामक दल पूरवत आहे.
2024 मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान झाले. मात्र यावेळी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात भाग घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील अग्निशामक बोलून मोठ्या कष्टाने बराच कालावधीनंतर ही आग आटोक्यात आणली होती. त्यानंतर एमआयडीसीला अग्निशामक दलाची स्वतंत्र योजना असावी अशी गरज भासू लागली. अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर-2024 ला याबाबतचा प्रस्ताव पाठविला. मात्र उद्योजकच त्याच्याकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे .
एमआयडीसीला स्वतंत्र अग्निशामक दलाची यंत्रणा आल्यानंतर एमआयडीसी मधील प्रत्येक उद्योगाला स्केअर फूटप्रमाणे कर द्यावा लागणार आहे. या करालाच उद्योजक विरोध करत असल्याने गेल्या पाच महिन्यापासून प्रस्ताव धुळखात पडलेला आहे. यावर संबंधित विभागाकडून मात्र अजूनही कोणते उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र उद्योजकांनी कर देण्यास नकार दिल्याने तशी यंत्रणाच नसल्यामुळे सर्वकाही महानगरपालिकेच्या अग्निशामक दलावर येथील उद्योजकांवर अवलंबून राहावे लागेल. मोठी काही घटना घडल्यास व यंत्रणा एमआयडीसीकडे पूर्ण नसल्यामुळे मोठी संभाव्य हानी होऊ शकते.
यापूर्वी 1992 ला एमआयडीसीकडे स्वतंत्र अग्निशामक दलाची यंत्रणा होती, मात्र ती यंत्रणा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यावेळी पासून आज पर्यंत महानगरपालिकेवरच एवढ्या मोठ्या उद्योग वसाहतीची जबाबदारी एका गाडीवर अवलंबून आहे एमआयडीसीमध्ये महानगरपालिकेने आपली जबाबदारी म्हणून एकच गाडी उभी केलेली आहे त्यामुळे भविष्यात मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहील हा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत उप अभियंता एस एस गाधीले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या पाच महिन्यापासून अग्निशामक दलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे. मात्र उद्योजकांची दोन वेळा बैठक घेऊनही सकारात्मक प्रतिसादाा अभाव आढळतो.