

जळगाव : नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील दहावी उत्तीर्ण 80 विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नव्हते. माजी प्रभारी मुख्याध्यापकांनी दाखले देण्यास सातत्याने अडथळे निर्माण केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती.
सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचली. त्यांनी तत्काळ कारवाई करत गटशिक्षण अधिकारी सरला पाटील, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण व खलील पठाण यांचे पथक शाळेत पाठवले.
मात्र प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा व शकील शेख मुसा यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून पथकाला प्रवेश नाकारला. यानंतर सीईओ करनवाल यांनी पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून पोलिस संरक्षणाची मागणी केली. पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करत संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
शनिवार (दि.28) आज रोजी माध्यमिक शिक्षण विभागाचे पथक पुन्हा पोलिस संरक्षणात शाळेत दाखल झाले. कार्यालयाला कुलूप असल्याने अधिकृत प्रक्रिया पार पाडून कुलूप तोडण्यात आले. गटशिक्षण अधिकारी सरला पाटील यांनी मुख्याध्यापकपदाचा एकतर्फी पदभार स्वीकारून, दप्तरी माहितीच्या आधारे दाखले तयार करून विद्यार्थ्यांना वाटप केले.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची तत्परता, कायदेशीर भूमिका आणि संवेदनशीलता ही समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. 80 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य वाचवून प्रशासनाने एक सकारात्मक उदाहरण निर्माण झाले आहे.