Jalgaon Temperature | जळगावकरांना मार्चमध्येच मे महिन्याचा चटका; तापमानाचा रेकॉर्ड मोडीत, पारा ४० अंशांवर

दुपारीच 'कर्फ्यू'सारखा शुकशुकाट; आर्द्रता घटल्याने कोरड्या उकाड्याने जळगावकर हैराण
Temperature
TemperaturePudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्याने राज्याच्या तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडण्यास सुरुवात केली असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने रौद्ररूप धारण केले आहे. बुधवारी (दि.११ मार्च) जळगावचा पारा चक्क ४०.३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी तापमान केवळ ३५.५ अंश होते, म्हणजेच यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात तब्बल ५ अंशांची वाढ झाली आहे. या भीषण 'हिट'मुळे जळगावकर आतापासूनच मे महिन्याच्या उन्हाची कल्पना करून हादरले आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत भीषण दाहकता

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी (२०२५) मार्चच्या पहिल्या दहा दिवसांत पारा ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान रेंगाळला होता. मात्र, यंदा ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या वर्षी ११ मार्चला जळगावकर ३५.५ अंशांच्या सुखद तापमानाचा अनुभव घेत होते, तर यंदा याच दिवशी ४०.३ अंशांच्या आगीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. २४ तासांत पारा ३९.६ वरून थेट ४० च्या पार गेल्याने उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.

आकडेवारी बोलत आहे (तुलनात्मक वास्तव)

तारीख : ९ मार्च

३८.६°C. २०२६ (कमाल तापमान)

३७.५°C. २०२५ (कमाल तापमान)

+ १.१°C फरक

तारीख : १० मार्च

३९.६°C. २०२६ (कमाल तापमान)

३८.२°C. २०२५ (कमाल तापमान)

+ १.४°C. फरक

तारीख : ११ मार्च

४०.३°C. २०२६ (कमाल तापमान)

३५.५°C. २०२५ (कमाल तापमान)

+ ४.८°C. फरक

कोरड्या हवेचा मारा, घामाच्या धारा

केवळ तापमानच वाढले नाही, तर हवेतील आर्द्रता (RH) झपाट्याने घटली आहे. ९ मार्चला ७२ टक्के असलेली आर्द्रता आज ६१ टक्क्यांवर आली आहे. यामुळे हवेत कोरडेपणा वाढला असून अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिक काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळत आहेत.

दिवसाचे कडक ऊन अन् रात्रीचे वातावरण तुलनेने थंड

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान तापमानातही घट झाली आहे (यंदा १५.२°C तर गेल्या वर्षी १९.६°C). याचा अर्थ दिवसाचे ऊन अधिक कडक आणि रात्रीचे वातावरण तुलनेने थंड, असा विचित्र विरोधाभास जाणवत आहे. यामुळे जळगावकरांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मार्चमध्येच ही अवस्था असेल तर एप्रिल-मे महिन्यात जळगाव 'सूर्यकुंडा'प्रमाणे पेटणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news