Jalgaon temperature | सूर्यनारायण कोपले, जळगावचा पारा चाळीशीपार

अवघ्या २४ तासांत तापमानात मोठी वाढ; जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही, दुपारी रस्ते ओस
Temperature Rise
Temperature RisePudhari
Published on
Updated on

जळगाव : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपता संपता जळगाव जिल्ह्याने आपला अस्सल तडाखा दाखवण्यास सुरुवात केली आहे. सूर्यनारायणाने आग ओकायला सुरुवात केल्याने अवघ्या २४ तासांत तापमानाचा पारा तब्बल ४१ अंशांवर पोहोचला असून, जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. शनिवारी ३८ अंशांवर असलेल्या पाऱ्याने रविवारी थेट ४१ चा टप्पा ओलांडल्याने जिल्हा आता 'हॉटस्पॉट' ठरत आहे.

२४ तासांत काय बदलले?

जळगावच्या हवामानात गेल्या दोन दिवसांपासून कमालीची अस्थिरता आणि उष्णता जाणवत आहे. शनिवार, ११ एप्रिल रोजी शहराचे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर किमान तापमान २१.५ अंश होते. मात्र, रविवारी (दि. १२) यात मोठी वाढ होऊन कमाल तापमान ४१.० अंशांवर गेले आहे. म्हणजेच एका दिवसात तापमानात २.२ अंशांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे किमान तापमानात घट (२०.० अंश) झाल्याने दिवसा कडक ऊन आणि पहाटे काहीसा कोरडेपणा असे विचित्र हवामान सध्या अनुभवायला मिळत आहे.

दुपारी 'कर्फ्यू'सदृश परिस्थिती

सकाळी १० वाजेपासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत तर जळगावचे रस्ते ओस पडत असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत. आर्द्रता ५५ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांवर आल्याने कोरड्या उन्हाचा तडाखा अधिकच टोचणारा ठरत आहे.

आरोग्याची काळजी घ्या

तापमानाचा पारा अचानक वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, लिंबू सरबत, ताक यांचा आहारात समावेश करावा आणि डोक्याला रुमाल किंवा टोपी लावल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था असेल, तर मे महिन्यात जळगावची अवस्था काय होईल, या विचारानेच जळगावकरांच्या अंगाला घाम फुटला आहे.

तापमानाचा ताळेबंद

११ एप्रिल

३८.८°Cकमाल तापमान

२१.५°Cकिमान तापमान

५५%आर्द्रता (RH)

१२ एप्रिल

४१.०°C. कमाल तापमान

२०.०°C. किमान तापमान

५१%आर्द्रता (RH)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news