

जळगाव : धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील हेमंत अरुण पाटील (वय २८) या तरुणाने पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीला, घटस्फोटाच्या धमक्यांना आणि मानसिक त्रासाला कंटाळून धावत्या रेल्वेखाली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी मृत हेमंत पाटील यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी गायत्री हेमंत पाटील, सासरे बाळू भीमराव बोरसे आणि सासू रेखाबाई बाळू बोरसे (रा. मंगरूळ, ता. अमळनेर) या तिघांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत पाटील हे आपल्या कुटुंबासह दोनगाव येथे राहत होते. काही दिवसांपासून त्यांची पत्नी गायत्री माहेरी मंगरूळ येथे निघून गेली होती. पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना, पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी हेमंत यांच्याकडे वारंवार पंधरा लाख रुपयांची मागणी केली. तसेच, "घटस्फोट घे नाहीतर पैसे दे" अशा धमक्या दिल्या जात होत्या. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि पैशांच्या दबावामुळे हेमंत पाटील यांनी २२ जुलै रोजी घरातून निघून पाळधी येथील रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली.
घटनेनंतर सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, पोलिसांनी तपास करून मृतदेह हेमंत पाटील यांचा असल्याचे निष्पन्न केले. हेमंत यांचे वडील अरुण विश्राम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी आणि सासरच्या मंडळींनी सातत्याने मानसिक छळ केला आणि पैशांची मागणी केली. त्यामुळेच हेमंत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करत आहेत.