

Sub Registrar arrested
जळगाव : सहकार विभागातील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून जळगावमध्ये वर्ग-१ उपनिबंधक आणि त्याच्या खाजगी एजंटला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देणे तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप उपनिबंधक (सहकारी संस्था, वर्ग-१) जगदीश बाबुराव बारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांचा खाजगी एजंट देविदास धनसिंग पाटील याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तक्रारदाराविरोधात सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशीदरम्यान, पुढील सुनावणीबाबत माहिती घेण्यासाठी ते उपनिबंधक कार्यालयात गेले असता लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाखांवर आली आणि पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.
तक्रारदाराने १८ मे रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १८ मे रोजीच लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी रक्कम खाजगी एजंट देविदास पाटील याच्याकडे देण्याचे निर्देश दिल्याचे निष्पन्न झाले.
२० मे रोजी दुपारी बी. जे. मार्केट परिसरातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना देविदास पाटील याला एसीबी पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर उपनिबंधक जगदीश बारी आणि एजंट देविदास पाटील यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.