

जळगाव : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. प्रायोजित ‘जळगाव कॅरम लिग 2025’ ही स्पर्धा प्रथमच २८ ते २९ जून दरम्यान कांताई सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील सहा संघांनी सहभाग नोंदविला होता. अटीतटीच्या लढतीनंतर मकरा चॅलेंजर्स संघाने अंतिम सामना जिंकून विजेतेपद पटकावले.
मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक युसूफ मकरा व संघाचे आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन यांना रोख रु. १५,००० व चषक देऊन गौरविण्यात आले. अप्पासाहेब लॅजेंटस संघ उपविजेता ठरला. त्यांच्या संघमालक ॲड. रविंद्र कुलकर्णी व आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे यांना रोख रु. १०,००० व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. नशिराबाद लॉयन्स संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरणप्रसंगी जैन इरिगेशनच्या क्रीडा विभागाचे अरविंद देशपांडे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, सर्व संघमालक सुपडू चौधरी, श्रीकांत पाटील, रेहान सालार, ॲड. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संदीप दिवे याला सन्मानित करण्यात आले. नशिराबाद लॉयन्स संघाला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. तसेच टाइल्स स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल जैन इरिगेशनचा विशेष गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील प्रत्येक संघात ५ खेळाडू असून, एकूण ३० खेळाडूंनी सहभाग घेतला. पंच म्हणून पुण्याचे रहीम खान व धुळेचे झोहेब खाटीक यांनी काम पाहिले. प्रत्येक संघाने ५ सामने खेळले. प्रत्येक सामन्यात २ एकेरी व १ दुहेरी सामना साखळीपद्धतीने पार पडला. अंतिम चार संघांची निवड गुणांच्या आधारे करण्यात आली.साखळी फेरीनंतर अंतिम चार संघ –
सालार किंग – ८ गुण
नशिराबाद लॉयन्स – ६ गुण
मकरा चॅलेंजर्स – स्थान ३
अप्पासाहेब लॅजेंटस – स्थान ४
उपांत्य फेरी निकाल: अप्पासाहेब लॅजेंटस २–१
सालार किंग मकरा चॅलेंजर्स २–१
नशिराबाद लॉयन्स अंतिम सामना: मकरा चॅलेंजर्स २–१
अप्पासाहेब लॅजेंटस – पहिल्या दोन गेम्समध्ये बरोबरी झाल्यानंतर, निर्णायक गेममध्ये सय्यद मोहसीन यांनी दमदार विजय मिळवत मकरा चॅलेंजर्सला पहिल्या कॅरम लिग स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विजयी व उपविजयी संघांचे कौतुक केले. गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सय्यद मोहसीन, मोहम्मद फजल, हबीब शेख व त्यांच्या जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या पने यांनी विशेष परिश्रम घेतले.