

जळगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल तर्फे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धांचा प्रारंभ गुरुवार (दि. 24) रोजी करण्यात आला. या स्पर्धा २४ ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रिडा ध्वजारोहण केले. सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, अरुण पवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व बियाणी ग्रुपच्या सचिव डॉ. संगीता बियाणी यांच्या हस्ते क्रिडाज्योत पेटवून स्पर्धांचे उद्धाटन करण्यात आले. आदिवासी थोर पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
बॅन्ड पथकाच्या तालावर सहभागी संघांच्या खेळाडूंनी संचालन करून मानवंदना दिली. पळसखेडा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ऱ्हिदमीक योगासने केली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या 17 शासकीय आश्रमशाळा व 32 अनुदानित आश्रमशाळांमधील सुमारे 1400 खेळाडू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्पर्धांत सहभाग घेतला आहे. खो-खो,कबड्डी, ॲथेलेटिक्स, व्हॉलीबॉल, हॅंडबॉल यासारखे विविध खेळ प्रकारांसाठी या स्पर्धा पार पडत आहेत.
जन्मतः विविध खेळ गूण अंगी बाळगणाऱ्या अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचा मोलाचा वाटा आहे. याठिकाणी सांघिक व वैयक्तिक खेळात विजेत्या खेळाडूंनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत देखील जास्तीत जास्त पदके जिंकून यावल प्रकल्पाचे नावलौकिक राखावे
अरुण पवार, प्रकल्प अधिकारी , जळगाव
जिल्हा क्रिडा अधिकारी नाईक यांनी आदिवासी खेळाडूंना जिल्हा क्रिडा विभागातील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येईल तसेच यावल प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व शाळांना दर्जेदार क्रिडा साहित्य देण्यात येईल असे आश्वासन दिले. तर भाषणात विजय शिंदे यांनी सहभागी खेळांडूंना प्रोत्साहित करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी क्रिडा अधिकारी सचिन निकम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील सहायक प्रकल्प अधिकारी पी. पी. माहुरे, सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, सहायक प्रकल्प अधिकारी लवणे, शिक्षण विस्तार अधिकारी, क्रिडा शिक्षक, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व शासकीय वासतिगृहांतील गृहपाल उपस्थित होते. सहायक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी आभार मानले.