

जळगाव : तरसोद ते फागणे दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 (पूर्वीचा 6) च्या चौपदरीकरणामुळे साईड रस्त्यांवर वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या साईट रस्त्यालगत नाल्यांचे काम सुरू असून त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक व्यवस्था नसल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सायंकाळी आणि पहाटेच्या वेळेत खोदकामाच्या परिसरात रेडियम पट्ट्या किंवा इशारा फलक नाही. त्यामुळे अंधारात वाहनचालकांना धोका निर्माण होऊन वाहन चालविण्यास अडचणी येत आहे. याच मार्गावर वळण असल्याने दुचाकी, रिक्षा, चारचाकी यांची मोठी वाहतूक होते. मात्र, एनएचएआयने (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.
तसेच, याच ठिकाणी असलेल्या दोन मोठ्या कंपन्यांच्या शोरूमसमोरील रस्त्याच्या मधोमध, मुख्य व साईट रस्त्याच्या दरम्यानच्या जागेत कर्मचारी वाहने पार्क करत असल्याचे दिसून येत आहे. ही पार्किंग पूर्णपणे नियमबाह्य असून ती मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. मात्र, यावर ना नशिराबाद पोलीस ठाण्याकडून किंवा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या संदर्भात संपर्क साधला असता अभियंता राहुल पाटील यांनी सांगितले की, “संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना सूचना देऊन फलक व बॅरिकेड लावण्याचे निर्देश देण्यात येतील.” नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.