

जळगाव : जळगाव नगरीतील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीराम नवमीच्या निमित्ताने दिनांक ६ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परंपरेनुसार कार्यक्रमांची सुरुवात पहाटे ४ वाजता काकड आरतीने होईल.
पहाटे ४.३० ते सकाळी ७.१५ या वेळेत महापूजा व अभिषेक पार पडेल.
सकाळी ७.३० वाजता प्रभू श्रीरामचंद्रांची मंगल आरती होईल.
सकाळी १०.३० ते १२ दरम्यान श्रीराम जन्मोत्सवाचे गुलालाचे कीर्तन ह.भ.प. श्रीराम महाराज जोशी यांच्या उपस्थितीत होईल.
दुपारी १२.३० वाजता महाआरती होणार आहे.
दुपारी २ ते ३ वाजता श्री मोरे व सहकारी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम होईल.
सायंकाळी ४ वाजता मोरया भजनी महिला मंडळ (मारुती पेठ) यांची भजन सेवा पार पडेल.
संध्याकाळी ६.३० वा. धुपारती होईल. त्यानंतर जळगावातील ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र घोषासह शांतीपाठ होणार आहे.
रात्री ८ वाजता संस्कार भारती, जळगाव यांच्या सादरीकरणात गीतरामायण प्रस्तुत केले जाईल.
दिनांक ७ एप्रिल रोजी श्रीगुरु महाराजांच्या पारंपरिक गोपाळकाल्याच्या भजनाने उत्सवाची सांगता होईल.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांत पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त, वहिवाटदार व विद्यमान गादीपती ह.भ.प. श्रीगुरु मंगेश महाराज जोशी आणि विश्वस्त मंडळींनी केले आहे.