

जळगाव : कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशावर महसूल व पोलीस प्रशासनाने रविवारी (दि.२५) मध्यरात्री संयुक्तपणे धडक ‘कारवाई’ केली. उत्राण व करदन शिवारात राबविलेल्या या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणारी ४ अवजड वाहने, वाहनांमधील १६ ब्रास वाळू आणि साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा साठा असा एकूण तब्बल ३१ लाख ५८ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे एरंडोल परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या संयुक्त आदेशानुसार ही मोहीम आखण्यात आली होती. २५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री उत्राण गावाच्या वेशीजवळ आणि करदन शिवारातील गिरणा नदीपात्रात छापे टाकून ही धडक कारवाई करण्यात आली.
पहिली कारवाई (उत्राण शिवार) : २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सहाचाकी आयशर (एमएच १८ बीजी ७२७) संशयास्पद स्थितीत आढळले. वाहनात ५ ब्रास वाळू भरलेली होती. पथकाला पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. या कारवाईत ६ लाख २३ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई (करदन शिवार) : २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास डंपर (एमएच १८ सीबी १९२०) ८ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी वाहनमालक निलेश राजेंद्र भदाणे व चालक रामू महादेव शिवाई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून ८ लाख ३७ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई (करदन शिवार) : मध्यरात्री १:३० वाजता २ ब्रास वाळू वाहून नेणारा आयशर वाहन (एमएच २० जीसी ९१४७) पकडण्यात आला. याप्रकरणी चालक शाहरुख शब्बीर पठाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत ६ लाख ९ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौथी कारवाई (करदन शिवार) : मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास १ ब्रास वाळूसह टाटा डंपर (एमएच ४८ एजी १५९३) पकडण्यात आला. याप्रकरणी भूषण शिवाजी सोनवणे (रा. विचूर, ता. जि. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल करून ८ लाख ४ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
६० ब्रासचा साठा एरंडोल तहसीलकडे वर्ग
पथकाने घटनास्थळावरून चारही वाहनांमधील १६ ब्रास वाळू जप्त केलीच, शिवाय नदीपात्रात अवैधरीत्या साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा भलामोठा ढिगाराही ताब्यात घेतला. हा साठा त्वरित एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता२०२३ चे कलम ३०३(२) (चोरी) सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार नितीन सूर्यवंशी, धर्मेंद्र ठाकूर, श्रीकांत ब्राम्हणे, निलेश गायकवाड, योगेश पाटील तसेच महसूल विभागाकडून एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील, मंडळ अधिकारी नदीम शेख (उत्राण), ग्राम महसूल अधिकारी रवीराज साहेबराव पाटील (उत्राण), वैभव पाटे (एरंडोल), संदीप पाटील (गालापूर) व नरेंद्र पाटील (उत्राण) यांच्या पथकाने केली.