

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाटा, मरिमाता मंदिराजवळ आज सकाळी (दि.4) सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी घडलेल्या आयशर (क्रमांक आर जे 11 जी सी 4306) व मोटरसायकल (क्रमांक एम एच 19 डी झेड 88 85) यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. मृतांमध्ये गजानन हिरामण पाटील व त्यांची पत्नी अश्वीनी गजानन पाटील यांचा समावेश आहे. ते रावेर तालुक्यातील कोचूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
हे दांपत्य आपल्या एक वर्षाच्या बाळासोबत द्वार दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अपघात अत्यंत भीषण असतानाही त्यांच्यासोबत असलेले लहान बाळ चमत्कारिकरित्या बचावले आहे. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.