

JalgaonTwo Wheeler Drug Seizure
जळगाव : शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत शिव कॉलनी परिसरातून एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थासह एका संशयिताला अटक केली. आरोपीकडून सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेल्या पथकाला शिव कॉलनीतील मातोश्री हॉटेल परिसरात काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या थांबून एमडी विक्रीसाठी ग्राहकांची वाट पाहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी नायब तहसीलदार राहुल वाघ, एसटी महामंडळाचे शासकीय पंच, फॉरेन्सिक पथक, वजन-मापक अधिकारी तसेच व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी सापळा रचला.
२९ जुलै रोजी पहाटे सुमारे १.२० वाजता पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव कल्पेश रायसिंग (वय २६, रा. शेंदणी वालकी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. त्याच्या काळ्या रंगाच्या सीबी युनिकॉर्न (एमएच-१९-सीसी-५०१६) दुचाकीची झडती घेतली असता सीटखाली लपवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या सात पुड्या आढळून आल्या.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळीच प्राथमिक तपासणी केली असता, त्या पुड्यांमध्ये असलेली पांढऱ्या स्फटिकासारखी पावडर ही मानवी आरोग्यास घातक असलेला एमडी अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. वजन केल्यानंतर त्याचे एकूण प्रमाण ५ ग्रॅम असल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी ५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ (अंदाजे किंमत २५ हजार रुपये), दोन सिमकार्डसह सॅमसंग एम३१एस मोबाईल (किंमत १० हजार रुपये) तसेच काळ्या रंगाची सीबी युनिकॉर्न दुचाकी (किंमत ४० हजार रुपये) असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश मधुकर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी कल्पेश रायसिंग याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत कलम ८(क) व २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेला एमडी अमली पदार्थ चोपडा येथून जळगावात कोणाला पुरविण्यात येणार होता, तसेच या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत.