

जळगाव : जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह बुधवारी (दि.11) सायंकाळी जोरदार पावसाने थैमान घातले. विजेच्या कडकडाटासह आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भागांमध्ये घरांचे, शेतीचे, वीजपुरवठ्याचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य आणि पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
जळगाव शहरात बुधवारी (दि.11) रात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसला आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती तर गुरुवारी (दि.11) पहाटेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पडलेले वृक्ष बाजूला करण्यात आले व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
एरंडोल तालुक्यात नारायण सिताराम पाटील (वय ६८) यांच्यावर घराचे छत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातील जगन रोहमाटे (वय ७५) यांच्यावर झाड कोसळून मृत्यू झाला आहे. जामनेर तालुक्यातील रीठीवाडी येथे रीहिणीबाई बारेला यांच्यावर पत्र्याचे शेड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर पाचोरा, यावल व जामनेर तालुक्यांमध्ये एकूण पाच जण जखमी झाले आहेत.
एकूण १७ जनावरे मृत्युमुखी पडले असून एरंडोल (१२), जामनेर (२), भडगाव (२), पाचोरा (१) अशाप्रकारे पशुधनाची हानी झाली आहे. तसेच चाळीसगाव – ७ घरे, भडगाव – ५ घरे, मलकापूर – ५ घरे, रावेर – ४ घरे तर एकूण – २१ घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून सर्व तालुक्यांमध्ये तत्काळ पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करत सर्व यंत्रणांना नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. शहर व ग्रामीण भागात मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, तालुका स्तरीय यंत्रणांना सक्रिय ठेवण्यात आले आहे. तसेच पुढील काही दिवस वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मदत व पुनर्वसनाचे काम सुरू असून सर्व संबंधित विभाग सज्ज झाला आहे.