

जळगाव : पुराच्या पाण्यामुळे केळीसह कपाशी पिकाच्या शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. शेतांमधून खळखळतं पुराचे पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात पिंपळगाव बु, पिंपळगाव खु, हिवरी, हिवरखेडा दिगर, पहूर पेठ, पहूर कसबे गावातील नदी काठच्या हजारो हेक्टर केळी व कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जळगांव : जामनेर तालुक्यातील हिवरी, हिवरीखेडा, हिवरखेडा दिगर या ठिकाणी वाघुर नदीला आलेल्या पुरामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी दोन ते तीन घरे वाहून गेलेली असून केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी तहसीलदार आपदा मित्र तसेच एचडी आर एफ धुळे यांना पाचरण करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यात वाघूर नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेतीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिवरी, हिवरखेडा दिगर या गावात वाघुर नदीचे पाणी शिरले आहे. तर वाकोद तोंडापूर पुलापर्यंत नदीचे पाणी टेकलेले असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिवरी, हिवरखेडा दिगर गावात पाणी शिरल्यामुळे तीन ते चार घरे वाहून गेली आहे.
पहूर पेठ गावात पाणी शिरले असून आठवडे बाजार परिसर पूर्णपणे पाण्याखाली आला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे हे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. वाघुर नदीची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी एस डी आर एफ धुळे या आपत्ती व्यवस्थापनच्या टीमला पाचारण केले आहे.
जामनेर तालुक्यात पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली आहे. अजींटा घाट येथून येणाऱ्या वाघूर नदीला पूर आल्याने पहुर येथे काही लोकांचें नुकसान झाले. घरात पाणी शिरले. गुरेवाहुन गेली आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.