जळगांव : जळगाव जिल्ह्यातील वाघूर नदीने धोक्याची पातळी गाठली असून काही घरांचे नुकसान झाले तर हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस झाल्याने हातनूर धरणाचे अठरा गेट पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. हातनुर धरणाचे सहा तासांमध्ये 18 दरवाजे उघडण्यात आले. यामधून 99 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेले हातनुर धरण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बराणपुर 34.8, डेड तलाई 29.4 ,टेक्सा 18.4, एरंडी 4.8, गोपालखेडा 25, चिखलदरा 55.6, लखपुरी 8.2, लोहटार 8.8 ,अकोला 21.4 एकूण 206.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर हातनूर परिसरामध्ये 38 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.