

जळगाव/भुसावळ: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या नादात होणारे अघोरी मृत्यू आणि भटक्या जनावरांमुळे विस्कळीत होणारी रेल्वे वाहतूक याला कायमचा लगाम घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने 'सुरक्षा कुंपणा'चा मास्टरप्लॅन तयार केला आहे. इगतपुरी-भुसावळ, भुसावळ-बडनेरा आणि भुसावळ-खंडवा या महत्त्वाच्या मार्गांवर आता सुरक्षेचे लोखंडी कवच उभारले जाणार असून, यामुळे रुळांवरील 'यमराजा'चा वावर थांबण्यास मोठी मदत होणार आहे.
अनाधिकृत प्रवेशावर आता 'स्ट्रिक्ट' वॉच
रेल्वे मार्ग दाट लोकवस्तीतून जात असल्याने अनेक ठिकाणी नागरिक जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. मात्र, आता हे प्रकार चालणार नाहीत. रेल्वेने केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष मैदानावर सुरक्षा कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे. हे कुंपण केवळ अडथळा नसून ते 'जीव वाचवणारी भिंत' ठरणार आहे. विशेषतः संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागात ही यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे.
पशुधन आणि प्रवाशांची सुरक्षा 'टॉप प्रायोरिटी'
भटकी जनावरे रुळावर आल्याने होणारे अपघात ही रेल्वे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर होतेच, पण गाडी रुळावरून घसरण्याचाही धोका असतो. आता कुंपणामुळे जनावरांचा प्रवेश रोखला जाणार असून, रेल्वेचा वेग आणि सुरक्षितता दोन्ही वाढणार आहे.
काय आहेत या मोहिमेचे मुख्य पैलू?
शून्य अपघात लक्ष्य: अनधिकृतपणे रुळ ओलांडणाऱ्यांना चाप बसून अपघाती मृत्यूंची संख्या कमी करणे.
अंडरपासचा धडाका: नागरिकांच्या सोयीसाठी विभागात सध्या १६० रोड अंडर ब्रिज (RUB) कार्यान्वित करण्यात आले आहेत.
प्रवासी सुविधा: स्थानकांवर पादचारी पूल (FOB), एस्कलेटर आणि लिफ्टची संख्या वाढवून रुळावर उतरण्याची गरजच उरणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
मानसिक आधार: लोको पायलट आणि गार्ड यांना रुळावरील अपघातांमुळे होणारा मानसिक त्रास या कुंपणामुळे कमी होणार आहे.
दुसऱ्या राज्यांचा 'सक्सेस फॉर्म्युला' आता जळगावात
गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात असा प्रयोग यशस्वी झाला असून तिथे अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून भुसावळ विभागाने तांत्रिक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवरही भर दिला आहे. आरपीएफ (RPF) कडून वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे.