

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या छाननी प्रक्रियेत भाजपाला पहिली आघाडी मिळाली आहे. जामनेर, भुसावळ आणि सावदा येथे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे समजते.
जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी नगरसेवक पदांचे तब्बल 3,835 अर्ज दाखल झाले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदांसाठी 242 अर्ज आले आहेत. मंगळवार (दि.18) रोजी सकाळी दहापासून तालुकास्तरावर छाननीला सुरुवात करण्यात आली.
भुसावळ येथे प्रभाग 7 ब मधील प्रीती मुकेश पाटील, सावदा येथील प्रभाग 7 मधील रंजना भारंबे आणि जामनेर येथील प्रभाग 11 ब मधील उज्वला दीपक तायडे हे भाजप उमेदवार बिनविरोध ठरले. याबाबत अधिकृत घोषणा मात्र माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर करण्यात येणार आहे.
दरम्यान, यावल आणि भुसावळ येथील अनेक उमेदवारांवर हरकती दाखल झाल्या आहेत. काही ठिकाणी सुनावण्या सुरू असून काही ठिकाणी छाननीनंतर सुनावण्या घेण्यात येणार आहेत. यावलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांवर भाजपाकडून हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.