

नरेंद्र पाटील, जळगाव
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून जिल्हा परिषद (ZP) आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रक्रियांना वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यपदे आणि नगराध्यक्षपदांसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेकांचे पत्ते कट झाले आहे तर काहींसाठी सत्तेचे नवे दरवाजे उघडले आहेत. आता खरी लढत प्रत्येक तालुका आणि शहरात ‘मिनी मंत्रालय’ (जिल्हा परिषद) आणि ‘शहरी सत्ता’ (नगरपालिका) मिळवण्यासाठी रंगणार आहे.
आरक्षण बदलामुळे भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) अनेक विद्यमान सदस्यांना व इच्छुकांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांच्या स्थानिक नेतृत्वावर मोठी जबाबदारी येत आहे.
शरद पवार गट:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अनुभवी आणि झुंजार नेतृत्व म्हणून पक्षाचे चेहरे राहतील. मुक्ताईनगरसह त्यांच्या बालेकिल्ल्यात पक्षाची ताकद टिकवणे आणि जिल्ह्यात पुन्हा प्रभाव निर्माण करणे ही त्यांची मोठी जबाबदारी असेल.
शिंदे सेना:
शिंदे गटाकडे जिल्ह्यात अनेक आमदार आहेत, तरी जिल्ह्याची धुरा प्रामुख्याने गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या समोर आपला मतदारसंघ मजबूत ठेवत संपूर्ण जिल्ह्यात संघटना मजबूत करण्याचे दुहेरी आव्हान आहे.
भाजप:
भाजपसाठी गिरीश महाजन पुन्हा संकटमोचक ठरण्याची शक्यता आहे. युती झाली तर इच्छुक आणि बंडखोरांना सांभाळावे लागेल, आणि युती न झाल्यास शिंदे गटाच्या ‘धनुष्यबाण’ला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकणार आहे.
पाचोऱ्यातून ‘एकला चलो’चा नारा
राज्यात महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट-अजित पवार गट) सत्तेत असली, तरी स्थानिक पातळीवर मतभेद स्पष्ट दिसू लागले आहेत. पाचोरा-भडगावमधून याची पहिली चाहूल लागली आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केले की, 'विधानसभेत आमच्या विरोधात लढलेल्यांना आम्ही सोबत घेणार नाही.' हा थेट ‘एकला चलो रे’चा इशारा मानला जात आहे. त्यामुळे पाचोऱ्यात शिंदे सेनेविरोधात इतर पक्ष आणि भाजपमधील नाराज गट एकत्र येण्याची शक्यता आहे.
आपला 'गड' राखण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस
जळगाव लोकसभेत शिवसेनेचा (एकत्रित) प्रभाव असला तरी स्थानिक निवडणुकांमध्ये प्रत्येक नेत्याला आपला गड राखावा लागणार आहे.
गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे हे आपल्या मतदारसंघात वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
भाजपसाठी जळगाव लोकसभा जिंकली असली तरी, स्थानिक स्तरावर शिवसेनेच्या पाठबळाशिवाय यश मिळवणे कठीण राहील.
शहरी सत्तेसाठी चुरशीच्या लढती
नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी काट्याची टक्कर अपेक्षित आहे.
मुक्ताईनगर: एकनाथ खडसे (शरद पवार गट) विरुद्ध चंद्रकांत पाटील (शिंदे गट) – पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट झुंज.
भुसावळ: भाजपचा मजबूत गड. मात्र विरोधी पक्ष आणि स्थानिक आघाड्या यावेळी आव्हान उभे करू शकतात.
सावदा: पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला हा गड आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरेल.
रावेर: भाजपचा प्रभाव असला तरी अपक्ष आणि स्थानिक आघाड्या समीकरणे बदलू शकतात.
यावल: मागील वेळी काँग्रेसने भाजपला मदत करून आपला ठसा उमटवला होता. यावेळी पक्ष आपली ताकद अधिक दाखवण्याच्या तयारीत आहे.
युती की बंडखोरी?
या निवडणुकीतला निर्णायक प्रश्न म्हणजे युती होणार की पक्ष स्वतंत्रपणे लढणार?
युती न झाल्यास: भाजपसमोर रावेरसह अनेक ठिकाणी शिंदे सेनेचे थेट आव्हान उभे राहील.
आणि
युती झाल्यास: भाजप आणि शिंदे गट या दोन्ही ठिकाणी बंडखोरीची शक्यता वाढेल. आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून, तिकीट न मिळाल्यास नाराज कार्यकर्ते स्वतंत्र उमेदवारी देखील देण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भाजपमध्ये अशी असंतोषाची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत. आगामी उमेदवारांच्या याद्या आणि आघाड्यांचे निर्णयच या निवडणुकीची दिशा ठरवतील. जळगाव जिल्ह्यातील राजकारण आता ‘मिनी मंत्रालय’ आणि ‘शहरी सत्ता’च्या नियंत्रणावर केंद्रित झाले आहे. एकंदरीत या सत्तास्पर्धेत प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.