

जळगाव : जळगाव महानगरपालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलवल्यानंतर भाजपने आपल्या सत्तेची पहिली झलक थेट नाशिकमध्ये दाखवली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर सर्व ४६ नगरसेवकांची 'वारी' नाशिकला नेऊन विभागीय आयुक्तांसमोर भाजपच्या गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली. या शक्तीप्रदर्शनात गटनेतेपदाची माळ प्रकाश बालानी यांच्या गळ्यात पडली असून, ठाकरे गटातून भाजपवासी झालेल्या नितीन बरडे यांना उपगटनेतेपदाचे 'रिटर्न गिफ्ट' मिळाले आहे. तर प्रतोद म्हणून चंद्रशेखर पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मनपा निवडणुकीत एकूण ७५ जागांसाठी ३३३ उमेदवार नशीब आजमावत होते. त्यापैकी १२ जागांवर निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडी झाल्या होत्या. मतमोजणीअंती भाजपने ४६ जागा खिशात घालत स्पष्ट बहुमत मिळवले, तर शिवसेनेला २२ आणि अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर भाजपने सर्व नगरसेवकांना घेऊन नाशिक गाठले आणि तिथे आयुक्तांसमोर अधिकृतपणे भाजप गटाची स्थापना करत सत्तेवर शिक्कामोर्तब केले.
निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितीन बरडे यांचे राजकीय वजन वाढले आहे. भाजपने त्यांना केवळ उमेदवारीच दिली नाही, तर निवडून आल्यावर थेट उपगटनेतेपदाची 'पदोन्नती' देत त्यांच्या पक्षप्रवेशाचे फळ त्यांना दिले आहे.
दुसरीकडे, घरकुल घोटाळ्यात नाव चर्चिले गेल्याने भगत बालानी यांचे तिकीट कापले गेले होते. मात्र, भाजपने त्यांच्या जागी त्यांचे बंधू प्रकाश बालानी यांना उमेदवारी देऊन 'बॅलन्स' साधला होता. आता प्रकाश बालानी यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडल्याने बालानी कुटुंबातील सत्ता पुन्हा अबाधित राहिली आहे. तिकीट कापले तरी गटपद घरातच राहिल्याने भाजपच्या या घराणेशाहीच्या खेळीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजप: ४६ (स्पष्ट बहुमत)
शिवसेना: २२
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०१