Jalgaon mayor | खुर्ची गरम व्हायच्या आतच तक्रारींचा पाढा; भाजप महापौरांना स्वपक्षाच्याच नगरसेविकेचा 'घरचा आहेर'

पदभार स्वीकारताच प्रभाग १३ च्या समस्यांचा 'महापूर'; नगरसेविका वैशाली पाटलांनी महापौरांच्या हातात टेकवले गाऱ्हाणे
Jalgaon mayor
Jalgaon mayor
Published on
Updated on

जळगाव : महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीत 'महायुती'चा गुलाल अजून हवेतच आहे, तोच नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांच्या समोर विकासकामांचे 'रिमांड' सुरू झाले आहे. भाजपच्या नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या चेंबरमध्ये पाऊल ठेवताच, त्यांच्याच पक्षाच्या प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी समस्यांचे भलेमोठे निवेदन हातात टेकवून "आधी काम करा, मग सत्कार स्वीकारा" असाच पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

सत्ता येताच समस्यांचा पाढा

महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची सत्ता येताच प्रलंबित कामांचा डोंगर आता समोर येऊ लागला आहे. प्रभाग १३ मधील नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात प्रशासकीय काळात प्रभागाची कशी दुर्दशा झाली, याचे वाभाडे काढले आहेत. "प्रशासक असताना ऐकणारे कोणी नव्हते, आता तरी आमच्या प्रभागाकडे बघा," अशी विनवणीवजा इशाराच त्यांनी या पत्रातून दिला आहे.

काय आहेत प्रमुख समस्या?

  • स्वच्छतेचा फज्जा: सफाई कामगारांची प्रचंड कमतरता असल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

  • घंटागाड्यांचा पत्ता नाही: कचरा संकलनासाठी वाहने अपुरी पडत असून वेळापत्रक कोलमडले आहे.

  • पायाभूत सुविधांची वाट: नवीन रस्ते, गटारी, ओपन स्पेसचे सुशोभीकरण आणि देखभाल-दुरुस्तीची कामे वर्षभरापासून रखडली आहेत.

बैठकीचा अल्टिमेटम

केवळ निवेदन देऊन वैशाली पाटील थांबल्या नाहीत, तर त्यांनी थेट महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत प्रभागातील अधिकारी आणि मक्तेदारांची 'संयुक्त बैठक' लावण्याची मागणी केली आहे. या बैठकीत प्रभाग १३ मधील नगरसेवक नितीन सपके, सौ. सुरेखा तायडे आणि प्रफुल्ल देवकर यांच्या उपस्थितीत कामांचा जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या महापौरांना पहिली 'अग्निपरीक्षा'

एकीकडे कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि गुलालाची उधळण सुरू असतानाच, स्वपक्षाच्या नगरसेविकेने दिलेल्या या निवेदनामुळे महापौरांची खुर्ची 'काट्यांची' ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील इतर नगरसेवकही आता अशाच प्रकारे आपल्या तक्रारी घेऊन येणार असल्याने, नवीन महापौरांना सत्कार स्वीकारण्यापेक्षा 'कामं' करण्यालाच प्राधान्य द्यावे लागणार आहे.

"प्रभागात स्वच्छतेचा आणि रस्ते-गटारींचा प्रश्न गंभीर आहे. घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. नवीन महापौर आणि आयुक्तांनी तातडीने बैठक घेऊन मक्तेदारांना आणि अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, जेणेकरून जनतेची रखडलेली कामे मार्गी लागतील."

— सौ. वैशाली अमित पाटील (नगरसेविका, प्रभाग १३)

गेल्या अडीच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कोणतीही बॉडी नव्हती त्यामुळे प्रशासक यांच्या कारभार एकटा हाती चालू होता मात्र आता बॉडी आल्यामुळे त्यात महिला महापौर असल्याने महिलांना स्वच्छतेची आवड असल्याने याकडे आता नीट लक्ष देण्यात येईल व कामे लवकरात लवकर करून घेण्यात येतील

— दीपमाला काळे, महापौर जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news