Jalgaon Police |भरलेल्या बंदुका बेवारस सोडून पोलिस कर्मचारी गायब; दोन पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड

जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी कर्तव्यावर असताना बेजबाबदारपणा, अचानक तपासणी केल्यानंतर आला प्रकार उघडकीस
Police
Police Pudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्याचे सर्वोच्च पोलीस पद असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याची सुरक्षाच आता वाऱ्यावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गार्ड ड्युटीवर असताना कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवणे आणि सरकारी शस्त्रास्त्रे बेवारस स्थितीत सोडून गायब होणे, या गंभीर कारणास्तव दोन पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षकांनी तातडीने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री ९:२० वाजेच्या सुमारास जळगाव पोलीस मुख्यालयाच्या राखीव पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक बंगल्याच्या 'गार्ड ड्युटी'चे अचानक निरीक्षण केले. यावेळी ड्युटीवर तैनात असलेले सफौ संभाजी निबाजी पाटील आणि पोना प्रदिप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या जागेवर हजर नसल्याचे आढळून आले. अत्यंत संवेदनशील असलेल्या या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेले जवानच गायब असल्याने तपासणी पथकही चक्रावून गेले.

तपासणी दरम्यान गार्ड रूममध्ये चक्क ३ एस.एल.आर. रायफली (बट नं. ८२.२६२.८८२) अत्यंत असुरक्षित आणि बेवारस स्थितीत टाकून देण्यात आल्या होत्या. या शस्त्रांची कोणतीही काळजी न घेता आणि सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवून हे दोन्ही कर्मचारी गायब झाले होते. अशा संवेदनशील ठिकाणी शस्त्रास्त्रे सोडून जाणे हा केवळ निष्काळजीपणा नसून तो पोलीस शिस्तीचा मोठा भंग असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

या दोन्ही अंमलदारांचे वर्तन हे 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९' च्या नियम ३ चे स्पष्ट उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले आहे. कर्तव्यावर गैरहजर राहणे आणि शासकीय शस्त्रास्त्रांची सुरक्षा धोक्यात घालणे हे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. निलंबन कालावधीत त्यांना पोलीस मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news