Jamner Illegal Liquor Raid | कांग नदीकाठावरील गावठी दारू अड्ड्यांवर छापा; १ हजार लिटर रसायन नष्ट

गोद्री-डालकी धरण परिसरात पहाटे धडक मोहीम; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
Country Liquor Seized Jalgaon
Country Liquor Seized JalgaonPudhari
Published on: 
Updated on: 

Country Liquor Seized Jalgaon

जळगाव : जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात फत्तेपूर पोलिसांनी धडक मोहीम राबवत गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कारवाई केली. जामनेर तालुक्यातील गोद्री शिवारातील कांग नदीकाठासह डालकी धरण परिसरात शुक्रवारी (दि. २० ) पहाटे टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच विक्रीसाठी तयार असलेली ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पथकासह गोद्री परिसरात ही मोहीम राबवली.

Country Liquor Seized Jalgaon
Jalgaon News: ५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार बडतर्फ पोलिसांसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या कारवाईत गूळ आणि नवसागर मिश्रित १ हजार लिटर कच्चे रसायन आढळून आले. त्याची किंमत सुमारे १ लाख रुपये असून, ते जागेवरच नष्ट करण्यात आले. याशिवाय ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.

चौघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे

या प्रकरणी जाबीर हसन तडवी (वय ३८), फकिरा रमेश तडवी (वय ३७) आणि हजराबाई युनुस तडवी (वय ३४) या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (फ) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अनुक्रमे ४०० लिटर (४० हजार रुपये), २०० लिटर (२० हजार रुपये) आणि ४०० लिटर (४० हजार रुपये) कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.

तर रहेमान कासम तडवी (वय ७१) याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.

Country Liquor Seized Jalgaon
Jalgaon news: चोपड्यातील खाऱ्यापाडावमध्ये गांजाची ‘तगडी’ शेती; ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक तसेच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन, सफौ प्रविण चौधरी, पोलीस हवालदार भूषण पाटील, चेतन तांगडे, सुमित पाटील, पांडुरंग सुरवसे आणि महिला पोलीस कर्मचारी अर्चना पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.