

जळगाव : चाळीसगाव येथील दोन महिला स्वयंसहायता बचत गटांच्या नावावर अंगणवाड्यांना आहार पुरवठा योजनेतील अनुदानाचा गैरवापर झाल्याच्या प्रकरणात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी फिर्याद नोंदवण्यास घेतलेली टाळाटाळ त्यांना भोवू लागली आहे. नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने तत्कालीन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
चाळीसगाव येथील माता माधवी आणि जय मातादी स्वयंसहायता महिला बचत गटांच्या नावाने अंगणवाड्यांना आहार पुरविण्याच्या योजनेत अनुदान मिळवण्यासाठी खोट्या स्वाक्षरीचा वापर करून बँक खाते उघडल्याचा आरोप आहे. या गटांच्या नावाने अनुदान लाटण्यात आल्याचे प्रतिनिधींना लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे सांगण्यात येते.
यावर बचत गटाचे प्रतिनिधी गणेश अग्रवाल यांनी नाशिक येथील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली. प्राधिकरणाने दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतल्यानंतर तत्कालीन निरीक्षक आव्हाड आणि एपीआय गोटला यांनी गुन्हा नोंदवण्यात दुर्लक्ष केले असल्याचे नमूद केले. त्यानुसार दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले.
ही चौकशी प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. ए. भटकर आणि सदस्य सुनील कढासणी तसेच अमित डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. गुन्हा नोंदवला नसल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.