

Jalgaon Theft Cases
जळगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला असून, सर्वसामान्यांची वाहने लंपास करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या चोरांचा सुळसुळाट मोडून काढण्यासाठी आणि त्यांना जरब बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि.६) सकाळी थेट अॅक्शन मोडमध्ये येत मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील सर्व रेकॉर्डवरील 50 ते 60 दुचाकी चोरांना पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आणून त्यांची जोरदार 'उलथापालथ' करण्यात आली. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
जळगाव शहर आणि परिसरातून दररोज दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांसमोर हे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने या चोरांना वठणीवर आणण्यासाठी आज विशेष मोहीम राबवली. संपूर्ण जिल्ह्यातील संशयित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दुचाकी चोरांना आज सकाळीच ताब्यात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आणण्यात आले.
एलसीबीच्या पथकाने या सर्व चोरट्यांची कसून चौकशी केली. त्यांचे सद्यस्थितीतील पत्ते, ते सध्या काय करत आहेत, आणि अलीकडच्या काळातील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा काय सहभाग आहे, याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा पोलिसांनी बाहेर काढला. यावेळी एलसीबीच्या खास 'स्टाईल'ने चौकशी केल्यामुळे अनेक चोरांची चांगलीच तारांबळ उडाली. या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास मदत होणार असून, आगामी काळात चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.