

जळगाव : शहरातील पांजरपोळ परिसरात अतिक्रमण विभागाच्या कारवाईदरम्यान एका लोड गाडीधारक हॉकर्सवर झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांना पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दमबाजी करत, “आम्ही हीच कामे करत बसायचं का?” अशा शब्दांत सुनावल्याचा आरोप केला आहे.
पांजरपोळ येथे अतिक्रमण विभागाने कारवाई करत असताना एक लोडगाडी धारक हॉकर्स व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादात हॉकर्सला मारहाण झाल्याचे स्पष्ट व्रण त्याच्या अंगावर दिसत होते. संबंधित व्यक्तीने शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस निरीक्षक कमलाकर यांनी उलटपक्षी त्यालाच अतिक्रमण केल्याबद्दल विचारणा करत खडे बोल सुनावले.
यानंतर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात आले आणि "आम्ही कोणालाही मारहाण केलेली नाही," असे म्हणाले. यावर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी "हा विषय आमचा नाही, आयुक्त पाहतील," असे म्हणत कोणताही गुन्हा दाखल न करण्याच्या सूचना दिल्या आणि गाडीत बसून निघून गेल्या.
जळगाव शहरात हॉकर्स आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील संघर्ष ही नित्याची बाब झाली आहे. नगरपालिकेने हॉकर्ससाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली असली, तरी बहुतांश विक्रेते रस्त्याच्या कडेला व मुख्य रस्त्यांवर व्यवसाय करताना दिसतात. त्यामुळे अतिक्रमण विभाग व विक्रेत्यांमध्ये नेहमीच वाद उद्भवत असतात. या घटनेत मारहाण झालेल्या हॉकर्सने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिल्याची माहिती भाजपाच्या प्रतिनिधींनी दिली आहे.