

Sand Mafia Crackdown Jalgaon
जळगाव : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धडक मोहीम उघडली असून, कसोदा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि.२७) रात्री करण्यात आलेल्या या दोन स्वतंत्र कारवायांत २ डंपर आणि ९ ब्रास वाळूसह एकूण २३ लाख ४२ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कसोदा उतरण रोडवरील इंदिरा नगर परिसरात २७ नोव्हेंबर रोजी रात्री ०१:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा डंपर पकडला. या डंपरमधून ३ ब्रास वाळूची विनापरवाना वाहतूक केली जात होती. पोलिसांनी डंपर व वाळूसह ८ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी डंपर चालक धर्मेश कैलास पाटील (रा. बिलाडी, ता. जि. धुळे) आणि मालक आकाश राजेंद्र पाटील (रा. रेल्वे स्टेशन रोड, धुळे) यांच्याविरुद्ध कसोदा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विशेष पथकाने रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास गांधली ते अमळनेर रोडवरील नवलभाऊ आर्मी स्कूलसमोर एक डंपर अडवला. तपासणीत डंपरमध्ये जळोद गावाजवळील तापी नदीतून अवैधरीत्या भरलेली ६ ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी डंपर व वाळूसह १५ लाख २८ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक अनिल चंद्रसिंग मोरे (वय २५) आणि मालक अकबर पठाण (दोघे रा. रुबजी नगर, बहादरपूर रोड, अमळनेर) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३०५ (ई) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड आणि . विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कसोदा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.