सिव्हिल हॉस्पिटलला चोरांचा वेढा? जिल्हापेठ पोलिसांचा धडाका; रिक्षा चोरट्याला मेहरुणमधून ठोकल्या बेड्या

Jalgaon theft News | रुग्णालयाबाहेरून रिक्षा पळवणारा कल्पेश इंगळे जेरबंद; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची तांत्रिक फिल्डिंग यशस्वी
सिव्हिल हॉस्पिटलला चोरांचा वेढा? जिल्हापेठ पोलिसांचा धडाका; रिक्षा चोरट्याला मेहरुणमधून ठोकल्या बेड्या
Published on
Updated on

जळगाव : सरकारी दवाखान्यात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चिंतेत असताना, बाहेर मात्र चोरटे डल्ला मारण्याची संधी शोधत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जळगाव शहराच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या गेट क्र. ३ मधून रिक्षा लांबवणाऱ्या एका अट्टल चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने अटक केली आहे. कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे असे या ३२ वर्षीय चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची चोरीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमधून १२ एप्रिल रोजी रिक्षा चोरीला गेल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा १०१/२०२६ दाखल करण्यात आला होता. प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी तपासासाठी विशेष पथक तैनात केले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. यादरम्यान पोलिसांच्या 'गोपनीय' खबऱ्याने टीप दिली की, रामेश्वर कॉलनीतील कल्पेश इंगळे याच्याकडे एक संशयास्पद रिक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथक मेहरुण परिसरात शोध घेत असताना कल्पेश हा जळगाव शहराच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पांडे डेअरी चौकातील एम.एस.ई.बी. ऑफिसजवळ सापळा रचला. संशयास्पद पॅजो रिक्षा येताच पोलिसांनी ती अडवली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कल्पेशला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरल्याची कबुली दिली.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोह मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर आणि प्रवीण जाधव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news