Jalgaon Police | कारवाईत दिरंगाई करणारे बोदवड पोलिस ठाण्यातील 'ते' तीन पोलीस अखेर निलंबित!

गुन्हा घडूनही प्रतिबंधक कारवाईत दिरंगाई; हिदायत नगरमधील वादाकडे दुर्लक्ष केल्याने घडला खुनाचा थरार;
Nanded Crime News
Jalgaon Police |कारवाईत दिरंगाई करणारे बोदवड पोलिस ठाण्यातील 'ते' तीन पोलीस अखेर निलंबित!File Photo
Published on
Updated on

जळगाव : दोन गटांतील धुसफूस आणि गंभीर वादाची आधीच माहिती असूनही निव्वळ डोळेझाक करणाऱ्या बोदवड पोलीस ठाण्याच्या तीन जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. या पोलिसांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच दोन दिवसांपूर्वी बोदवडमध्ये खुनाचा थरार उडाला आणि कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे निघाले.

याप्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी कारवाई करत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि (API) दिपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी एएसआय (ASI) रविंद्र गुरचल आणि हेड कॉन्स्टेबल (HC) नंदकिशोर धनके यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दोन गटांत तीव्र धुसफूस सुरू होती. १ मे रोजी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ००९६/२०२६ अन्वये BNS कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) नुसार गंभीर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी आणि दुसऱ्या पक्षात तीव्र वाद पेटला होता. या वादातून पुढे अदखलपात्र (NCR) गुन्हा क्र. ०२८०/२०२६ देखील नोंदवण्यात आला होता. ही परिस्थिती स्फोटक असतानाही पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि दोन्ही पक्षांतील जुना वाद पाहता, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्याची अधिकृत जबाबदारी पोहेकॉ नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु, धनके यांनी दोन्ही बाजूंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे गांभीर्य पार वाऱ्यावर सोडले. कोणतीही चौकशी किंवा प्रतिबंधक कारवाई न करता त्यांनी या प्रकरणाकडे पाठ फिरवली. परिणामी, धुसफूसत असलेल्या वादाचा स्फोट झाला आणि थेट खुनाचा गंभीर गुन्हा घडला.

बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून मिरवणारे एएसआय रविंद्र गुरचल यांच्यावर शहराची मुख्य जबाबदारी होती. १९ मे रोजी हिदायत नगर येथे दोन्ही पक्षांत वाद सुरू असल्याचा फोन आल्यावर ते पोकॉ मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी धावून गेले. बिट प्रभारी असल्याने त्यांना या वादाच्या तीव्रतेची खडान् खडा माहिती होती. तिथेच दोन्ही बाजूंच्या लोकांवर प्रतिबंधक किंवा कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, गुरचल यांनी अत्यंत निष्काळजीपणा दाखवत दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणले आणि कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ समज देऊन सोडून दिले. पोलिसांच्या याच 'मवाळ' भूमिकेमुळे आरोपींचे धाडस वाढले आणि अवघ्या दोनच दिवसांत म्हणजेच २१ मे रोजी थेट एकाचा खून करण्यात आला.

पोलीस ठाण्याचे कारभारी म्हणजेच सपोनि दिपक सुरवडकर यांनी अकार्यक्षमतेचा कळस गाठला. १९ मे रोजी हिदायत नगरमधील वादाची संपूर्ण माहिती पोलीस कर्मचारी मोहन चौधरी यांनी सुरवडकर यांना फोन करून आणि व्हॉट्सॲपवर नावांसह पाठवली होती. एवढेच नव्हे तर, स्थानिक नगरसेवकानेही सुरवडकर यांना थेट फोन करून तिथल्या अत्यंत संवेदनशील परिस्थितीची जाणीव करून दिली होती.

एवढी माहिती मिळूनही सुरवडकर यांनी स्वतः घटनास्थळी जाणे टाळलेच, शिवाय आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. विशेष म्हणजे, या संवेदनशील वादाची माहिती त्यांनी वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत दिली नाही. पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून स्वतःच्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले.

सध्याच्या अत्यंत संवेदनशील वातावरणात पोलिसांची अशी ढिम्म आणि निष्काळजी वृत्ती जळगाव पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारी ठरली आहे. वेळेत प्रतिबंधक कारवाई झाली असती, तर खुनाची ही गंभीर घटना टाळता आली असती. अखेर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने या तिघांनाही निलंबित करून घरचा रस्ता दाखवला आहे. या कारवाईमुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news