Jalgaon pistol gang busted: जळगावात ‘पिस्तुल्यांचा’ सुळसुळाट; जिल्हापेठ पोलिसांकडून सात जण गजाआड

८ गावठी कट्टे व १० जिवंत काडतुसे जप्त; मध्यप्रदेशातून पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Jalgaon pistol gang busted
Jalgaon pistol gang bustedPudhari
Published on
Updated on

जळगाव : शहरात गुन्हेगारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या आणि गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश करत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत ८ अवैध गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसे असा सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली होती की, यश रामदास नन्नवरे (रा. धनगर बिल्डिंग, जळगाव) हा तरुण बेकायदेशीर पिस्तुल घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला भजी गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्तुल आढळून आले. पुढील चौकशीतून पोलिसांनी एकामागून एक सात जणांना अटक केली.

तपासाची साखळी उलगडली

यश नन्नवरे याच्या चौकशीतून केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव) याचे नाव पुढे आले. भालेराव याने ही शस्त्रे समाधान बळीराम निकम (रा. यावल) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी समाधान निकम याला नेरी (ता. जामनेर) येथून ताब्यात घेतले. त्याने मध्यप्रदेशातून शस्त्रे आणून विविध आरोपींना विकल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे:

  1. यश रामदास नन्नवरे (रा. जळगाव) – १ पिस्तुल

  2. केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव) – १ पिस्तुल, ३ काडतुसे

  3. गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा) – १ पिस्तुल

  4. विकास प्रकाश काकडे (रा. साळसिंगी) – २ पिस्तुल, २ काडतुसे

  5. जगदीश गजानन महाजन (रा. मध्यप्रदेश) – २ पिस्तुल

  6. कैलास राजेंद्र माळी (रा. बोरकुंड, धुळे) – १ पिस्तुल, ५ काडतुसे

  7. समाधान बळीराम निकम – मुख्य आरोपी

मुख्य आरोपी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार

या रॅकेटचा सूत्रधार समाधान निकम हा सराईत गुन्हेगार असून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या (कलम ३०७) गंभीर गुन्ह्यात फरार होता. तसेच यावल आणि वरणगाव पोलीस ठाण्यांमध्येही विविध गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड होता. मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणून खान्देशातील तरुणांना विकण्याचे धोकादायक काम ही टोळी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांचे विशेष पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे आणि नरेंद्र दिवेकर यांचा समावेश होता.

पुढील तपास सुरू

जप्त केलेल्या ८ पिस्तुलांपैकी आणखी काही शस्त्रे इतरांना विकण्यात आली आहेत का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news