

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये गुलाबराव देवकर यांच्या झालेल्या प्रवेशावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अजित पवार नेहमीच छातीठोकपणे म्हणतात की "माणसं तपासून घेतो." यावर निशाणा साधत गुलाबराव पाटील म्हणाले, "खूपच सुंदर माणसं त्यांनी तपासून घेतली आहेत. देवकर हे त्याचेच उदाहरण आहे. पुढच्या काळात अजितदादा यांना कळेल की हे तपासलेले माणूस चुकीचे होते."
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास अहिराणी शैलीत सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि नंतर देवकरांच्या प्रवेशावरून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "देवकर थ्री टायरमधून टू टायर एसीत का जात आहेत, हे अख्या जगाला माहिती आहे. त्यांच्या विरोधात मजूर फेडरेशन आणि रुग्णालय भाड्याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. शासनाकडून 27 लाख रुपये घेतलेल्या रुग्णालयाचे 8 कोटी रुपयांचे भाडे त्यांनी आतापर्यंत उचलले आहे. यावर पांघरून टाकण्यासाठीच ते अजित पवार गटात गेले आहेत."
"निवडणुकीदरम्यान देवकर यांनी 10 कोटी रुपयांची विड्रॉल केली होती. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे," असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच, "ते जिल्हा बँकेचे संचालक असताना स्वतःच्या पतसंस्थेच्या नावाने दहा कोटींचे कर्ज घेतले, जे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार गैरकायद्याचे आहे. याबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे," असा आरोपही त्यांनी केला.
"मी घोटाळा केला नाही, असे देवकर सांगतात, मग गेल्या सहा महिन्यांपासून ते गप्प का होते? एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचे होते, तेव्हा कुठे झोपले होते?" असा सवाल करत गुलाबराव पाटील यांनी दावा केला की, "माझ्यासोबत आणि शिंदे साहेबांसोबत देवकरांची बैठकही झाली होती."
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का, या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "हे त्यांच्या हातात आहे. याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे."