

Jalgaon Collector Office Agitation
जळगाव: जिल्ह्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांच्या बदलीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. आपल्या लाडक्या शिक्षिकेची बदली रोखण्यासाठी आज (दि.६) पाथरी येथील विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
पालकांसह विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी राहुल घुगे यांच्या दालनासमोर ठिय्या मांडत "आमच्या मॅडमची बदली रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत जाणार नाही," असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी एका चिमुकल्या विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे घातलेले साकडे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
नेमके प्रकरण काय?
पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या उज्ज्वला सावकारे यांनी आपल्या कार्यकाळात शाळेचा कायापालट केला आहे. त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळेची पटसंख्या तर वाढलीच, शिवाय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे. मात्र, प्रशासकीय नियमानुसार त्यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाची लाट उसळली. ही बदली तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करण्यात आली होती.
शाळा जिल्हाधिकारी कार्यालयातच भरवू
आंदोलक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. "जर सावकारे मॅडमची बदली रद्द झाली नाही, तर आम्ही गावात शाळा भरू देणार नाही. वेळ पडल्यास आम्ही सर्व विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातच शाळा भरवू," असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेसाठी ढसाढसा रडताना पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण हेलावून गेले होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक आश्वासन
विद्यार्थ्यांची भावना आणि पालकांचा आग्रह लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल घुगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. "शासकीय प्रक्रिया आणि नियम लक्षात घेऊन या प्रकरणात योग्य तो सुवर्णमध्य काढला जाईल," असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी जोपर्यंत लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत पालकांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे.