Jalgaon Pal Hill Station : पालचे विश्रामगृह दयनीय अवस्थेत
जळगाव : जिल्ह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पाल सध्या दयनीय अवस्थेत आहे. वनविभागाच्या देखरेखीखाली असलेले विश्रामगृह पूर्णपणे उपेक्षित असून, तेथील पायाभूत सुविधा मोडकळीस आल्या आहेत. नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते येथे जंगल सफारीचे उद्घाटन करण्यात आले असले तरी, पर्यटकांच्या सोयीसाठी असलेली व्यवस्था मात्र पूर्णतः ढासळलेली आहे.
विश्रामगृहाच्या परिसरात सध्या बेडकांचे राज्य
विश्रामगृहाच्या परिसरात असलेल्या कारंज्यांमध्ये सध्या बेडकांचे राज्य असून, योग्य देखभालीअभावी तेथे शेवाळाची घाण पसरलेली आहे. भिंतींवर झाडांची मुळे वाढलेली असून, भिंती ठिकठिकाणी जराजर झाल्या आहेत. दुसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यांच्या पत्रा वाकलेल्या असून, काही ठिकाणी लाकडी संरचना तुटल्या आहेत.
पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवलेले पाइप्स गळतीमुळे शेवाळांनी झाकले गेले आहेत. यामुळे परिसरात घाण व अस्वच्छता वाढलेली आहे. काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय देखील दिसून येतो. भिंतींच्या खालच्या भागातील रंगाचे पोपडे निघाले असून, संपूर्ण इमारतीचा देखावा जर्जर अवस्थेत पोहोचला आहे.
वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पर्यटनस्थळाची प्रतिमा मलीन पहा फोटो
पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही अवस्था नकारात्मक अनुभव निर्माण करणारी आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले पाल जळगाव जिल्ह्याच्या कडेकोट उन्हापासून सुटका देणारे निसर्गरम्य ठिकाण असून, येथे अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्याची क्षमता आहे. मात्र, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे या पर्यटनस्थळाची प्रतिमा मलीन होत आहे.
स्थानिकांनी या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून, संबंधित विभागाने तातडीने सुधारणा करून पर्यटकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

