

chain snatching in Pachora
जळगाव : पाचोरा शहरातील भडगाव-पाचोरा रोडवर असलेल्या जय भवानी मॉल परिसरात शुक्रवारी रात्री एका अज्ञात चोरट्याने शिक्षिकेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची 'मिणी पोत' जोराने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचा हा ऐवज घेऊन चोरटा दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील बंद पथदिवे चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील चिंतामणी कॉलनीतील रहिवासी आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या वैशाली योगेश मोरे (४६) या १५ मे रोजी रात्री आपल्या बहिणीसह (रेखा भीमराव चव्हाण) संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी जय भवानी मॉलमध्ये गेल्या होत्या.
यावेळी रात्री ९:४५ च्या सुमारास खरेदी करून त्या पायी घराकडे परतत असताना, भडगाव रोडवरील पथदिवे बंद असल्याने याच अंधाराचा फायदा घेत ४० वर्षे वयोगटातील चोरट्याने वैशाली मोरे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोरे भगिनींनी आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर लावलेल्या आपल्या मोटारसायकलवर स्वार होऊन तो क्षणार्धात पसार झाला. याप्रकरणी वैशाली मोरे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहेत.