

जळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार (दि.21 जून) रोजी भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले. आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, मध्य रेल्वे भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
या योगदिन कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा निखिल खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मंडल रेल्वे प्रबंधक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, तसेच विविध विभागांचे अधिकारी, शाळांचे विद्यार्थी, नागरिक आणि रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
योग शिक्षिका चंचल माळी, डॉ. आदित्य आणि डॉ. शरयू यांनी योगासने प्रात्यक्षिकांसह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नसून तो जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे, जो तणावमुक्त जीवन, मानसिक संतुलन आणि आत्मिक शांतीसाठी अत्यावश्यक आहे. या योग सत्रात प्राणायाम, योगासने आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. उपस्थितांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत एकरूपता साधली. तसेच कार्यक्रमातून “नियमित योगाभ्यास करा, निरोगी आयुष्य जगा” हा संदेश देण्यात आला.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी योगाचा जीवनशैलीतील समावेश आणि त्याचे आरोग्यावर होणारे फायदे अधोरेखित करत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. मंत्री संजय सावकारे यांनीही योगाच्या सामाजिक आणि मानसिक फायद्यांविषयी माहिती दिली.
भुसावळ रेल्वे विभागातील विविध डेपो, कार्यशाळा आणि कार्यालयांमध्येही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सोशल मीडियावरून योग दिनाचे महत्त्व पटवून देणारे संदेश प्रसारित करत व्यापक जनजागृतीही करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी विशाखापट्टणम येथील मुख्य कार्यक्रम, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, तो दूरचित्र प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपणातून दाखविण्यात आला, याची उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने अनुभव घेतला.