

जळगाव: नरेंद्र पाटील
पोस्टने आपली जुनी कात टाकून आधुनिकतेशी जवळीक साधली आहे. पोस्टामध्येही संगणकीकरण झालेले असले तरी आजही पोस्टमन पूर्वीप्रमाणेच आपल्या घरापर्यंत पत्र पार्सल घेण्यासाठी येतो मात्र पूर्वी सायकलवर यायचा, नंतरच्या काळात मोटरसायकलवर यायला लागला. आता मात्र हे पोस्टमन काका इलेक्ट्रॉनिक सायकलवर कार्यालय व घरापर्यंत पत्र देण्यासाठी येत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव व चाळीसगाव या पोस्ट विभागात प्रायोगिक तत्त्वावर दोन इलेक्ट्रॉनिक सायकल दाखल झालेल्या आहेत.
पोस्टमन म्हटलं की खाकी कपडे घातलेला व्यक्ती सायकलवर किंवा मोटरसायकलवर आपल्या घरी पत्र आणून देणारा व्यक्ती डोळ्यासमोर येतो या पोस्टमनचे या आधुनिक काळामध्ये रूप पालटलेले असून जो पोस्टमन पूर्वी सायकलवर पत्र वाटण्याचे काम करत असेल तो या आधुनिक युगात मोटरसायकलवर नागरिकांच्या घरापर्यंत पत्र वाटप करत आहे. यामध्ये पोस्टमनच्या खिशाला पेट्रोलची झळ बसत होती या गोष्टीचा विचार करुन शासनाने पोस्टमन यांना इलेक्ट्रॉनिक सायकल दिलेली आहे. जी सायकल इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालणार असून ती 25 किलोमीटर पर्यंत चालू शकते. बॅटरी संपल्यानंतर तिला पायडल मारून ती सायकल सारखी ही पुढे चालू शकते. त्यामुळे रस्त्यात बॅटरी संपल्यावर ही पोस्टमनला सायकलला ढकलावी लागणार नाही.
शासनाने पोस्टमनला इलेक्ट्रॉनिक सायकल दिल्याने पेट्रोल व श्रम दोन्ही वाचणार आहे. तसेच त्याचे शरीरही तंदुरुस्त राहणार असून काही प्रमाणात का होईना पोस्टमन यांना इलेक्ट्रॉनिक सायकल हाताळणे सोपे होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक सायकलला एक्सीलेटर असून एक दिवा आहे. चाबीने ही सायकल सुरू होते व त्यानेच लॉकही होते. या इलेक्ट्रॉनिक सायकलच्या मागे कॅरिअर असून त्या ठिकाणी बॅगमध्ये संपूर्ण पार्सल किंवा पत्र ठेवून वाटप सहज होऊ शकते.
जळगाव शहरामध्ये पहिली सायकल ही पीएम सोनार या पोस्टमनला प्रायोगिक तत्त्वावर सायकल मिळाली आहे. त्यांच्याकडे तीन मोठ्या कॉलनी तर 45 सरकारी दफ्तर किंवा पत्र पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
इलेक्ट्रॉनिक सायकल जळगाव पोस्ट विभागात शुक्रवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या आहेत. एक जळगाव शहरात तर दुसरी चाळीसगाव पोस्ट कार्यालयात देण्यात आलेली आहे. ही सायकल प्रायोगिक तत्त्वावर असून पुढील महिन्यात दोन अजून इलेक्ट्रॉनिक सायकल दाखल होणार आहेत.
एस एस म्हस्के, मुख्य डाक अधीक्षक जळगाव